महायुतीच्या क्रांतिकारी योजनांचा लाभ घेत महिलांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न
सामुहिक रक्षाबंधन सोहळा महिला भाजप पदाधिकाऱ्यांना राखी बांधताना |
- महावाणी : विर पुणेकर
- २९ ऑगस्ट २०२४
गोंडपिपरी : काल २८ ऑगस्ट रोजी गोंडपिपरीत आयोजित सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात नारीशक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. भाजपा महिला मोर्चा गोंडपिपरी तसेच मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तथा भाजपा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी महिलांना संबोधित करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यातील लाखो गरजू व गोरगरिब बहिणींना दिलासा देणारी ठरली आहे. महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच आमच्यासाठी उर्जास्त्रोत आहे."
महिला भगिनींनी या सोहळ्यात उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांना राखी बांधून सामूहिक रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमात अनेक युवक आणि महिलांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला, त्यांचे स्वागत करताना देवराव भोंगळे यांनी महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमात तालुक्यातील आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या १०८ योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली, आणि महिलांना या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन भोंगळे यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित महत्त्वाच्या मान्यवरांमध्ये जिल्हा महामंत्री विवेक बोढे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी गेडाम मॅडम यांच्यासह भाजपा पक्षाच्या अनेक नेत्यांचा समावेश होता.
महिला सक्षमीकरण आणि राज्याच्या क्रांतिकारी योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने गोंडपिपरीचा हा सोहळा एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
#Gondpipri #RakhiCelebration #WomensEmpowerment #MahawaniNews #CMsSisterScheme