हडस्तीतील सिमेंट काँक्रेट मार्गाच्या कामाच्या कासव गतीमुळे नागरिक त्रस्त, प्रशासनाला मोठ्या आंदोलनाची चेतावणी
हडस्ती गावातील कोंक्रीट मार्गावर वाहतूक कोंडीचे दृश्य |
- महावाणी: विर पुणेकर
- २९ ऑगस्ट २०२४
चंद्रपूर/हडस्ती: हडस्ती गावातील सिमेंट काँक्रेट मार्गाचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे, परंतु या कामाच्या अत्यंत धीम्या गतीने गावकरी प्रचंड नाराज झाले आहेत. गावाच्या एका बाजूचा मार्ग तयार होऊन साधारण एक महिना झाला आहे, तरीही हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे गावातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. Slow Road Work
वाहतूकदारांना आता बाजूच्या अरुंद मार्गाने प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होणे अपरिहार्य झाले आहे. या अरुंद मार्गावरून एकावेळी फक्त एकच वाहन जाऊ शकत असल्याने, दोन वाहन एकमेकांसमोर आल्यास संपूर्ण वाहतूक ठप्प होते. परिणामी, अर्धा तास किंवा त्याहून अधिक काळ वाहतूक ठप्प होते. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत आणि नागरिकांचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे.
या परिस्थितीबद्दल गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत प्रशासनाला कंत्राटदाराने दिलेल्या निकृष्ट व्यवस्थांबाबत विचारणा केली. कंत्राटदाराने सुरुवातीला पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक होते, परंतु त्याऐवजी काम पावसाळ्यात सुरू केले गेले. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक नागरिकांनी प्रशासन आणि कंत्राटदाराच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत तात्काळ मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून ही तक्रार प्रशासनापर्यंत पोहचली असली तरी, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. Slow Road Work
गावकरी आता या परिस्थितीला कंटाळले असून, जर तातडीने मार्गाचे काम पूर्ण केले गेले नाही, तर मोठ्या आक्रोश मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गावकरी व सदर मार्गाने दैनंदिन प्रवास करणारे नागरिक सहभागी होणार आहेत. प्रशासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
#HastiVillage #RoadConstruction #ChandrapurNews #SlowProgress #MahawaniNews