काँग्रेस नेते राजू झोडे यांचा पोलिसांच्या निलंबनाला विरोध, स्वातंत्र्यदिनाच्या आनंद साजरा करणे गुन्हा नाही
- महावाणी : विर पुणेकर
- २५ ऑग २०२४
नागपूर: स्वातंत्र्यदिनाच्या (१५ ऑगस्ट) मुख्य कार्यक्रमानंतर नागपूरच्या एका पोलीस ठाण्यात दोन पुरुष पोलीस आणि दोन महिला अंमलदार "खैके पान बनारस वाला" या गाण्यावर नृत्य करताना दिसले. त्यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला आणि या चार पोलिसांना तत्काळ सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणामुळे पोलिस दलातील शिस्तभंगाच्या घटनांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. लोकशाहीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आनंद साजरा करण्यास हरकत नाही, असे म्हणत काही लोकांनी या निलंबनाला विरोध दर्शवला आहे. परंतु, पोलीस दलातील काही अधिकारी मात्र अशा प्रकारचे वर्तन शिस्तबद्धतेच्या दृष्टीने योग्य नाही, असे मत व्यक्त करत आहेत.
काँग्रेस नेते राजू झोडे यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, "लोकशाहीत आनंद साजरा करणे हा गुन्हा नाही. पोलीस तणावाखाली काम करतात आणि थोडा आनंद घेण्यासाठी ते असे करत असतील तर त्यात चुकीचे काही नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे.
पोलिसांनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नियमांचे उल्लंघन होणे हा गंभीर प्रकार आहे. पोलीस दलात अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही.” यावरून पुढील काही दिवसांत या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल अपेक्षित आहे, ज्यावरून या पोलिसांवर अंतिम कारवाई होऊ शकते.
पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन चुकीचे प्रशासनाने निलंबन मागे घावे. स्वातंत्र्यदिनाच्या आनंद साजरा करणे चुकीचे नसून सर्व भारतीयाचा अधिकार आहे. -आप नेते, सुरज ठाकरे
#NagpurPolice #PoliceSuspension #IndependenceDay #KhaikePaan #NagpurNews #MahawaniNews