आ. सुभाष धोटेंनी अधिवेशनात मांडल्या क्षेत्रातील खराब रस्त्यांच्या व्यथा.

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर
१२ डिसेंबर २३

        राजुरा : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. विधानसभेत आज लोकप्रिय आमदार सुभाष धोटे ( mla subhash dhote ) यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील खराब रस्त्यांच्या व्यथा मांडून येथे तातडीने रस्ते पुर्ण करण्याची मागणी शासनाकडे केली. तसेच बामणी ते लक्कोडकोट राष्ट्रीय महामार्गासाठी वळण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. 

         यात पोंभुर्णा तालुक्याला जोडणारा आक्सापूर-चिंतलधाबा रस्ता बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येऊनही अल्पावधीत रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाल्याचे माहे ऑक्टोबर २०२३ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-राजूरा मार्गावरही खड्डे पडले असून वर्धा नदीवरील पुलाला कठडे नसल्याने अनेक अपघात घडत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तर काहींना अपघातात जीव गमवावा लागला आहे हे वास्तव लक्षात आनुन दिले. 

      त्यामुळे या गंभीर प्रकरणी शासनाने चौकशी करुन रस्ता व नदी पुलावरील कठडा दुरुस्ती करण्यास विलंब का लागत आहे. आणि यात संबंधित दोषींवर कारवाई करण्याबाबत काही कार्यवाही करणार आहे काय अशी विचारणा केली आहे. 

       यावर संबधित खात्याचे मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, आक्सापूर ते चिंतलधाबा प्रजिमा-२४ या रस्त्यांची एकूण लांबी ७.५०० कि.मी. आहे. सदर रस्त्यावर ६.३०० कि.मी. लांबीमध्ये रुंदीकरण व मजबूतीकरण व डांबरीकरणाचे काम मार्च-२०२३ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेली रस्त्यांची लांबी संबंधित कंत्राटदारांकडून दुरुस्त करण्यात येत आहे. उर्वरित १.२०० कि.मी. लांबीमध्ये रुंदीकरण, मजबूतीकरण व डांबरीकरणाचे रक्कम रु.३०० लक्ष चे मंजूर कामाचे कार्यारंभ आदेश दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले असून सदरचे काम ऑक्टोबर, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच वरोरा-चंद्रपूर-बामणी या राज्यमार्गावरील बल्लारपूर ते बामणी ही १३.८०० कि.मी. लांबी खाजगीकरणांतर्गत प्रकल्पामध्ये समाविष्ठ असून, सदर लांबीतील देखभाल व दुरुस्तीची कामे सवलती करारनाम्यातील तरतूदीनुसार संबंधित उद्योजकांकडून करुन घेण्यात आले आहे. आणि बामणी-राजूरा राष्ट्रीय महामार्ग वरील ७ कि.मी लांबीमध्ये अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती काम पूर्ण करण्यात आले असून सद्य:स्थितीत रस्ता वाहतूकीस सुस्थितीत आहे. सदर रस्त्यावर वर्धा नदीवरील बुडीत पूलांचे पावसाळ्यादरम्यान काढलेले लोखंडी कठडे पुनःश्च लावण्यात आले आहे. तर बामणी ते लक्कोडकोट राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ( mla subhash dhote in Winter Session Nagpur ) ( mahawani ) ( rajura )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top