बिज प्रक्रिया करून पेरणी करावी कृषि विभागाचे आवाहन #Agriculture Department

Mahawani

 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
०९ नोव्हेंबर २३

        चंद्रपूर: जिल्हयातील कोरडवाहू व बागायती क्षेत्रावरील मातीची तपासणी केली असता दिवसेंदिवस सेंद्रीय कर्ब कमी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे, जसे बल्लारपूर, चंद्रपूर, व मुल तालुक्यातील सेंद्रीय कर्ब ०.२१ ते ०.४० असून उर्वरित तालुक्यातील ०.४१ ते ०.६० टक्के सेंद्रिय कर्ब उपलब्ध असल्याचे तपासणी अहवालानुसार दिसून येते. खरीप हंगाम २०२३ मध्ये चंद्रपूर जिल्हयात सोयाबिन पिकावर वेगवेगळ्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचे सर्वांना ज्ञात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विज्ञापिठाच्या तज्ञ समितीने बुरशीजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा मातीत मिसळवून देणे अथवा बिजप्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत नमूद केले आहे. कृषि उत्पादनात पिक संरक्षणास जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व बीज प्रक्रियेस सुध्दा आहे. बिज प्रक्रिया केल्यास रोपाची निरोगी उगवन होऊन प्राथमिक अवस्थेत किड व रोगास कमी बळी पडते परिणामी बिजप्रक्रिया मुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ देखील होते. घरघुती बियाणे वापर करीत असतांना प्रतवारी करून ठोकळ एकसारख्या बियाण्याची उगवणशक्ती तपासुन व बिजप्रक्रीया करुनच पेरणी करावी. 

बीज प्रक्रियेचे फायदे : 

१. बियाणेद्वारे उदभवणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते. २. बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते व रोपांना शेतात प्रस्थापित होण्यास मदत होते. ३. किड / रोग नियंत्रणाच्या खर्चात बचत होते. ४. बियाण्याची उगवणशक्ती वाढून उत्पादनात वाढ होते. ५. साठवणगृहात साठवणुकीदरम्यान बियाण्याचे संरक्षण होते. ६. पिक एकसारखे वाढते व मशागतीचा खर्च कमी येतो. ७. उत्पादित धान्याचा दर्जा वाढला जाऊन बाजार भाव चांगला मिळतो. 

बीज प्रक्रीयेमध्ये घ्यावयाची काळजी : 

१. बीज प्रक्रियेसाठी वापरावयाची औषधे सर्व बियाण्यास समप्रमाणात सारखी लागतील याची काळजी घ्यावी. 

२. प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरू नये, प्रक्रिया केलेले बियाणे थंड व कोरडया हवेत सावलीत २४ ते ४८ तास वाळवावे. ३. बीज प्रक्रीयेसाठी ड्रम वापरावा तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणात बियाणे व औषध घालून मडक्याचे तोंड फडक्याने बांधावे व मडके तिरके, उभे, आडवे, सुलटे असे काही काळ हलवावे म्हणजे सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात औषध लागेल. ४. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही याची काळजी घ्यावी. ५. रासायनिक बिजप्रक्रिया पेरणीपुर्वी ९० दिवस अगोदर करुन वापरता येते परंतू जैविक प्रक्रीया केल्यानंतर २ तासाच्या आत पेरणी करावी. 

बीज प्रक्रीयांचे प्रकार खालील प्रमाणेः 

अ) रासायनिक व बुरशीनाशकांची प्रक्रिया : बाजारात विविध कंपन्याचे बुरशीनाशक व किटकनाशके बिजप्रक्रियेकरीता उपलब्ध असतात कोणत्याही कंपनीचे औषधे वापरतांना वेष्टनावरील मजकूराचा वाचन करुन प्रती किलो शिफारस केली औषधांची मात्रा विचारात घेवून बिजप्रक्रिया करावी. प्रथम बुरशीनाशकाचे बिजप्रक्रीया करुन बियाणे सुकल्यानंतर रासायनिक बिजप्रक्रीया करावी. बाजारात काही नविन औषधी उपलब्ध झालेली आहे. जसे पिसीटी - ४१०२.५ मीली. अधिक ५ लिटर पाणी प्रति किलो व इलेक्ट्रॉन, क्यॅसकेड व वार्डन ५ मीली. अधिक ५ मीली पाणी प्रती किलो. या ५ उत्पादनात बुरशीनाशके व किटकनाशके एकत्र असल्याने इतर रासायनिक औषधे वापरण्याची गरज नाही. 

१. बुरशीनाशकाचे द्रावणात बियाणे ठराविक काळापर्यंत भिजवावे. २. बुरशीनाशकाचे घट्ट द्रावण तयार करुन बियाण्यास लावावे आणि नंतर लगेच सुकवावे. ३. बुरशीनाशकाची भुकटी मडक्यात किंवा ड्रममध्ये टाकून हलवावे. यात बुरशीनाशकाचा थर बियाण्याच्या पृष्ठभागावर व्यवस्थितरित्या लावला जाईल याची काळजी घ्यावी. 

ब) जैविक किंवा जीवाणू संवर्धन प्रक्रिया : १. एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे. २. वरील द्रावण थंड झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात २५ ग्रॅम प्रती कि. जीवाणू संवर्धन मिसळावे. ३. प्रक्रिया केलेले बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे. ४. शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास लावावे. ५. बियाण्यास प्रथम बुरशीनाशक व किटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जैविक जिवाणू संर्वधकांची बिजप्रक्रीया करावी. 

क) भौतिक बीज प्रक्रिया : १. मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया मिठाच्या द्रावणाच्या प्रक्रीयेमध्ये प्रथम ३० ग्रॅम मीठ प्रती लीटर पाणी याप्रमाणे ३% मिठाचे द्रावण या प्रमाणात तयार करावे. अशा मिठाच्या द्रावणात बियाणे ५ ते १० मिनिटे बुडवावे आणि नंतर ३ ते ४ वेळा ढवळावे. हलके, रोगयुक्त व दुषित बियाणे पाण्याच्या पृष्ठभागावर जमा होईल ते काढून नष्ट करावे. पाण्याच्या खालच्या बाजूला जमा होणारे रोगमुक्त, वजनदार बियाणे पेरणीसाठी उपयोगात आणावे.. या बीज प्रक्रियेचा उपयोग बाजरी, ज्वारीवरील अरगट आणि भातावरील करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी होतो.  २. उष्णजल प्रक्रिया ही प्रक्रिया कंद, कांड्या किंवा बेणे याकरिता उपयुक्त आहे. बियाणे किंवा बेणे ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर ४९ ते ५४ डिग्री सें. तापमान असलेल्या पाण्यात टाकतात. ऊसावरील गवताळ वाढ व इतर विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी हि प्रक्रिया केली जाते. ( Appeal of Agriculture Department to process and sow seeds ) ( mahawani ) ( Agriculture Department )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top