वेगळ्या विदर्भाला जनतेचे सहमत नाहीलोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(०१ जुलै २०२३)

        नागपूर: वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात १००-२०० लोकांपेक्षा जास्त लोक येत नाहीत. वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला जनतेचे समर्थन नाही. जोपर्यंत जनतेचे समर्थन मिळत नाहीत तोपर्यंत वेगळा विदर्भ कसा होईल, असे परखड मत नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले आहे.

रामदासपेठ येथील एका हॉटेलात आयोजित कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विदर्भाचा विकास, वेगळा विदर्भ यावर मते व्यक्त केली. वेगळ्या विदर्भाची मागणी आता बाजूला पडली काय, असा प्रश्न गडकरी यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, मी तर याबाबत कधीच बोलत नाही. आमच्या पक्षाने ज्यावेळी वेगळा विदर्भाचा ठराव घेतला, त्यावेळी मला समर्थन असल्याचे वाटत होते. पण या विषयाला जनतेचे समर्थन नाही. विदर्भाच्या आंदोलनात १००-२०० लोकांपेक्षा जास्त लोक येत नाहीत. जर उद्या या आंदोलनात दहा हजार, एक लाख आले आणि दिवंगत जांबुवंतराव धोटे यांच्यासारखे आंदोलन झाले तर त्यामध्ये मीपण सामील होईल. जोपर्यंत जनतेचे समर्थन वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला मिळत नाहीत तोपर्यंत वेगळा विदर्भ कसा होईल, असा सवालही त्यांनी केला.गडकरींच्या अजेंड्यावर वेगळा विदर्भ कुठे आहे, असा सवाल करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, विदर्भावर अन्याय होत होता, विदर्भात रोजगार, उद्योग नव्हते. येथील जंगल विकसित झाले नव्हते. परिणामी विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे आली होती. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होण्याकरिता गेल्या आठ-नऊ वर्षांत जेवढी कामे केली तेवढी ६०-७० वर्षांत झाली नाही. चांगले रस्ते बनले. चांगले उद्योग यायला लागले. बघता-बघता विदर्भ बदलला आहे. विदर्भाच्या लोकांना विदर्भाच्या राजकारणात रुची नाही. खादीचे कडक कपडे घालून फिरणाऱ्या नेत्यांसमोर ते बोलत नाहीत एवढेच. येथील लोकांना विकास महत्त्वाचा आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करणारा नेता आणि पक्ष असेल त्यांच्या मागे जनता उभी राहते, असेही गडकरी म्हणाले.

To Top