दारूविक्रेत्यांला राहले नाही वेळेचे भान।
लोकवानि- विरेंद्र पुणेकर 
(०९ मे २०२३)

                    तब्बल सहा वर्षाने दारूबंदी उठल्याने तळीराम आनंदित आहेत. मात्र, येथील काही परवानाधारक दारूविक्रेते निर्धारित वेळेला 'ठेंगा' दाखवून सकाळी आठ वाजतापासूनच दारू विक्री करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सकाळपासूनच दारूविक्री सुरू होत असल्याने तळीरामांची तहान भागत आहे. मात्र, याकडे दारू उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे.  दारूबंदी उठल्यानंतर शहरात बियर बार, बियरशॉपी व वाईन शॉपीला लागलेले कुलूप उघडण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल सहा वर्षांनंतर शहरात दारूविक्रीला सुरुवात झाली आहे. पण दारूविक्री करताना परवानाधारक निर्धारित वेळेला वाकोल्या दाखवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी दहा वाजल्यानंतरच दारूविक्री  करण्याचे निर्देश आहे. मात्र, शहरातील काही परवानाधारक सकाळीच मागचा दरवाजा उघडून दारूविक्री करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काही बारमध्ये सकाळी सहा वाजताच तळीरामांना 'एकाच प्याला' मिळत असल्याने त्यांची तहान भागत आहे. हा प्रकार एक्साईजच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणारा आहे. परंतु याकडे संबंधित विभाग कानाडोळा करीत असल्याने परवानाधारकांचे चांगलेच फावत आहे. खुलेआम दारूविक्री सुरू असताना अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून असल्याने संशय बळावला आहे. काही महिण्याअगोदर राजुरा, रामपूर परिसरात सकाळीच दारूचे दुकाने उघडत होते. याबाबत माध्यमांत वृत्त प्रकाशित झाले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी काही परवानाधारकांची कानउघाडणी केल्याचे समजते.

To Top