लॉकडाऊन व अनलॉक काळात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !लोकवाणी- विरेंद्र पुणेकर

लॉकडाऊन व अनलॉक काळात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

        चंद्रपूर दि. 27 जून:अन्न व औषध प्रशासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लॉकडाऊन व अनलॅाक कालावधीत धडक कारवाई केलेली आहे. 25 जून रोजी विष्णू  झाडूजी उईके रा.गांगलवाडी ता.ब्रह्मपुरी यांच्याकडील प्रतिबंधित जेन मजा 108 सुगंधित तंबाखू, ईगल हुक्का शीशा टोबॅको 1.9 किलोग्रॅम  असा एकूण 4 हजार 554 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी पाथरी पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.

आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 175 आस्थापनांची सखोल तपासणी करून प्रतिबंधित अन्नपदार्थ जसे खर्रा, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व पान मसाला अशा एकूण 35 प्रकरणात 1259.89 किलोग्रॅम एकूण 24 लाख 16 हजार 127 रुपये किमतीचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. विक्रेत्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक जे खर्रा, गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादन, साठा, वितरण, विक्री, वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 59 अंतर्गत कारवाई होऊन 6  वर्षाचा कारावास व 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो,असे  आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य), चंद्रपूर यांनी केले आहे.
To Top