दुरुस्तीच्या नावाखाली टोलवाटोलवी
गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथील राजुरा-गोविंदपूर राज्य महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीवरून नागरिकांत प्रचंड असंतोष असून, याबाबत गटनेते विक्रम येरणे यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. Gadchandur Highway Repair गडचांदूर महामार्गाचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वी CRF अंतर्गत करण्यात आले होते. मात्र, हे काम अत्यंत हलक्या दर्जाचे झाले असून, पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले. तत्कालीन ठेकेदाराने केवळ लिपापोती करत दोन वर्षे वेळ मारून नेली. दरम्यान, सदर महामार्ग NHAIच्या ताब्यात गेला.
सध्या या महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, नागरिकांनी केलेल्या पाहणीनुसार खडीकरण फक्त दोन-तीन दिवसांत खराब झाले आहे. यावर पुढे मजबुतीकरण व डांबरीकरण अपेक्षित आहे, परंतु मूलभूत नियम असा आहे की, जर खालचा तळच योग्य नसेल, तर कितीही डांबरीकरण केले तरी रस्ता टिकणार नाही. Gadchandur Highway Repair परिणामी, हा महामार्ग काम पूर्ण होण्याआधीच पुन्हा खराब होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात गडचांदूर नगर परिषदेचे काँग्रेस गटनेते विक्रम येरणे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. कामाच्या दर्जाची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि हे काम NHAI च्या दर्जानुसार पारदर्शकपणे व्हावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. Gadchandur Highway Repair तसेच, भविष्यात जर महामार्गावर खड्डे पडले, तर त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित केली जावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गडचांदूरसह संपूर्ण परिसरातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. Gadchandur Highway Repair स्थानिक प्रशासन आणि NHAI यांनी या कामाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अन्यथा लवकरच नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.