संस्थापकांच्या आत्मवेदनादायी शब्दांनी शिक्षण क्षेत्रातील नैतिक अधःपतनाचा भांडाफोड
Education Ethics | राजुरा | शिक्षण म्हणजे समाज उन्नतीचे, समतेचे आणि नैतिकतेचे माध्यम. शिक्षण संस्थांचे संस्थापक ही समाजाची नैतिक ठेव असते. मात्र, राजुरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळात सध्या जे सुरू आहे, ते शिक्षणाच्या तत्वज्ञानालाच काळिमा फासणारे आहे. स्मृतीशेष श्री. प्रभाकरराव मामुलकर ज्यांनी आयुष्यभर “शिक्षणातून माणूस घडावा, बाजारू व्यवहार नव्हे” हा मंत्र जपला त्यांच्याच जयंतीच्या नावावर आज संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून सरळसरळ आर्थिक वसुली सुरू असल्याचे दस्तऐवजांवरून स्पष्ट होत आहे.
दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी शिवाजी हायस्कूल, राजुरा येथून काढण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार १९ डिसेंबर २०२५ रोजी श्री. प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रम आयोजन हा आक्षेपाचा मुद्दा नाही; मात्र त्या आयोजनाच्या नावाखाली संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यावर ‘निधी’ नावाखाली ठराविक रक्कम बंधनकारक करण्यात आली आहे. मुख्याध्यापकांकडून ३५०० रुपये, शिक्षकांकडून ३००० रुपये, लिपिकांकडून २००० रुपये आणि शिपायांकडून ७०० रुपये ही रक्कम १२ डिसेंबर २०२५ पर्यंत श्री. अन्वर अली यांच्याकडे जमा करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. हा निधी ऐच्छिक आहे की सक्तीचा? याचा कुठलाही खुलासा नोटीसमध्ये नाही. मात्र “आदेशान्वये” हा शब्द स्वतःच सर्व काही सांगून जातो. शिक्षण संस्थेमध्ये आदेश म्हणजे नोकरी, सेवा अटी आणि भविष्य यांचा दबाव. त्यामुळे ही मागणी देणगी नसून प्रत्यक्षात पदनिहाय ठरवलेली सक्तीची वसुली आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर श्री. प्रभाकरराव मामुलकर यांच्या नावाने समोर आलेले आत्मवेदनादायी शब्द केवळ भावनिक आवाहन नाहीत, तर आजच्या व्यवस्थेवरचा थेट आरोप आहेत. “जीवनभर मी कधी कोणाकडून पैसा मागितला नाही. माझ्या दारातून कोणी निराश गेले नाही. बिना डोनेशन मी शिक्षण क्षेत्रात विकास केला,” हे शब्द एखाद्या काल्पनिक कथेतले नाहीत, तर त्या माणसाच्या आयुष्याची साक्ष आहेत, ज्यांच्या नावावर आज पैशाची पोती उचलली जात आहेत. ज्या व्यक्तीने स्वतःचा वाढदिवसही कधी खर्चिक थाटात साजरा केला नाही, ज्या व्यक्तीने शिक्षक भरती करताना ‘देणगी’ या शब्दालाच संस्थेतून हद्दपार केले, त्या व्यक्तीच्या जयंतीच्या नावावर आज संस्थात्मक वसुली चालू आहे. हा केवळ दांभिकपणा नाही, तर नैतिक गुन्हा आहे. कारण इथे स्वर्गीय माणसाच्या प्रतिमेचा वापर जिवंत लोकांकडून पैसा उकळण्यासाठी केला जात आहे.
सर्वात गंभीर प्रश्न असा आहे की दरवर्षी जमा होणारा हा निधी नेमका किती असतो? किती शाळा, किती कर्मचारी, आणि एकूण किती रक्कम जमा केली जाते? त्या पैशाचा हिशोब कुठे आहे? खर्चाचे तपशील कर्मचाऱ्यांसमोर मांडले जातात का? लेखापरीक्षण होते का? की ही रक्कम काही मोजक्या लोकांच्या “सांस्कृतिक” जीवनशैलीसाठी वापरली जाते? या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी संस्थेच्या प्रशासनावर आहे.
शिक्षण संस्थेतील शिपायाकडून ७०० रुपये घेणे म्हणजे केवळ आर्थिक शोषण नाही, तर सामाजिक संवेदनशून्यता आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे पगार आधीच तुटपुंजे आहेत, ज्यांच्यावर कुटुंबाचा भार आहे, त्यांच्यावर ‘जयंती’ नावाखाली अतिरिक्त आर्थिक ओझे टाकणे हे कुठल्या मूल्यांशी सुसंगत आहे? मामुलकर साहेबांच्या विचारांशी तर अजिबातच नाही.
खरा प्रश्न असा आहे की जयंती साजरी नेमकी कोणासाठी? संस्थापकांच्या विचारांसाठी की संस्थेतील सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी? कारण जर जयंतीचा उद्देश मूल्यांचा वारसा जपणे असता, तर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, किंवा समाजोपयोगी कार्यक्रम राबवले गेले असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या खिशात हात घालण्याची गरजच नसती. आज मामुलकर साहेब “स्वतःच्या आत्म्याने” प्रश्न विचारत आहेत “माझ्या नावावर वसुली करून माझी जयंती साजरी केल्याने मला शांती मिळेल का?” हा प्रश्न केवळ भावनिक नाही; तो व्यवस्थेच्या नैतिकतेवरचा आरसा आहे. आणि त्या आरशात सध्या जे दिसते आहे, ते अत्यंत विदारक आहे.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थांनी हे लक्षात घ्यावे की श्रद्धा आणि स्मृती या व्यापारासाठी नसतात. संस्थापकांचे नाव ही मालमत्ता नाही की ज्यावर दरवर्षी आर्थिक उत्पन्न काढायचे. जर हा प्रकार तात्काळ थांबवला गेला नाही, तर ही केवळ एक संस्थेची बदनामी ठरणार नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासालाच तडा जाईल.
आज गरज आहे ती स्पष्टतेची, पारदर्शकतेची आणि नैतिक धाडसाची. कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा जाहीर हिशोब द्यावा लागेल. ‘देणगी’ ऐच्छिक नसेल, तर ती सक्तीची वसुली मानली जाईल आणि त्याचे कायदेशीर व नैतिक परिणामही होतील. मामुलकर साहेब यांच्या नावाचा सन्मान करायचा असेल, तर त्यांच्या विचारांचा सन्मान करा. त्यांच्या नावावर पैसे गोळा करू नका. कारण मृत माणसाच्या नावावर चालणारी ही जिवंत वसुली, शेवटी त्या माणसाच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणावरच घाला घालणारी आहे.
What is the main allegation in this news report?
Why is the fund collection being questioned?
How does this issue impact the education sector?
What is being demanded through this exposure?
#EducationScam #ForcedDonation #SchoolCorruption #EducationEthics #FounderLegacy #InstitutionalAbuse #TeacherExploitation #EducationNews #IndiaEducation #SchoolManagement #EducationAccountability #TransparencyNow #CorruptionInEducation #StaffRights #EducationReform #PublicInterestJournalism #EducationSystemFailure #SchoolFunds #IllegalCollection #EthicalCollapse #EducationCrisis #TeachersVoice #Whistleblower #EducationJustice #NoToExtortion #EducationWatch #IndianSchools #AcademicIntegrity #EducationGovernance #CorruptPractices #EducationTruth #EducationDebate #SchoolAdministration #EducationPolicy #EducationAwareness #EducationAccountabilityNow #StaffExploitation #EducationRights #EducationLaw #SchoolScam #EducationExpose #MoralDecay #EducationStandards #EducationInvestigation #EducationMedia #SchoolEthics #EducationReality #EducationAlert #MahawaniNews #RajuraNews #VeerPunekarReports
.png)

.png)